August 10, 2015

Gorakhgad Trek - गोरखगड

गोरखगड- 

 तारीख : ८ ऑगस्ट २०१५


किल्ले गोरखगड, काढली बाईक आणी निघालोना बुंगाट. तसा जवळच पण आडवळणावरचा किल्ला. म्हणूनच राहिला होता खूप दिवसांपासून. हो-नाही करता करता दोघेच राहिलो नेहमीचे पंटर. कर्जत वरून “म्हसा” या गावी पोहोचून दहेरी गावात पोहोचावे लागते. गावातून थोडा मागे येवून मंदिरामागून एक पाउलवाट जंगलात शिरते. तसा लोकांच्या जास्त माहितीतला नाहीये हा गड, म्हणूनच इतर गड/किल्ल्या पेक्षा वर्दळ कमी आहे गोरखगडावर.
हा भाग तसा भीमाशंकरच्या अभायाराण्याचाच भाग आहे. मच्छिंद्रगड, गोरखगड हे शेजारी शेजारी आहेत. गोरखगड म्हणजे नाथसंप्रदायातल्या गोरक्षनाथांच्या साधनेची जागा. सिद्धगड, गोरक्षगड आणी मच्छिंद्रगड असा आवडता ट्रेक करणारे खूप ट्रेकर्स आहेत. आधी सिद्धगड करून जंगलातून धबधब्यांचा आनंद घेत गोरखगडावर पोहोचायचं, तेथेच मुक्काम करून मग गोरखगडावर मार्गक्रमण करून माचीन्द्रगडावर निघायचं, असा हौशी गिर्यारोहकांचा मार्ग असतो. गोरक्षगड आणी मच्छिंद्रगडाच्या सुळक्यांमुळे तसा हा हाडाच्या गिर्यारोहकांसाठी हवाहवासा ट्रेक आहे.
आम्ही मात्र गोरखगडाचाच मार्ग निवडला. दहेरी गावात गाडी लावून आणी नोंदणी करून जंगलात मार्गक्रमणा सुरु झाली. जास्तीत जास्त २ तासात पोहोचतायेण्या सारखा गड आहे हा, म्हणून जवळ फक्त पाण्याची बाटली घेवूनच निघालो. अधून मधून पाऊस हजेरी लावतच होता. समोर मच्छिंद्रगड आणी गोरखगडाचे सुळके दिसत होते.

जंगल पार करून सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचतानाच एक मोठा आवाज ऐकू येऊ लागला, आधी वाटलं आखादा रस्ता असावा आणी गाड्यांचा आवाज येतोय, पण जंगलातून बाहेर येताच समोरच दृश्य खिळवून ठेवणारं, अप्रतीमच होतं. डावीकडे सिद्धगड, समोर एक उंच डोंगररांग त्या वरून अथक वाहणारा धबधबा तिथली शांतता भंग करत होता. ढगांची चादर समोरच्या डोंगरावरून उतरंडीला लागली होती, आमच्या नशिबाने पाऊस थांबला होता आणी सूर्यदेवाने सर्व जंगलावर चकचकीत उन्हाची पखरण केली होती. आणी त्यावरच ढगांचे आचादन पसरले होते. बैलाच्या अंगावर दगड्माराल्यानंतर जशी पाठ थरथरते तशी गवताची पाती वाऱ्यामुळे थरथरत होती आणी त्या हालचाली बरोबर अंगावर तयार झालेल्या मोत्यांच्या माळा खालच्या मातीमध्ये सांडत होत्या. किती सुंदर स्वर्ग अवतरला होता. पुढे निघावसच वाटत नव्हत. तिथेच गवताच्या गालिच्यावर बसकण मारली आणी डोळे बंदकरून धबधब्याचा रौद्र भीषण आवाज कानांमध्ये साठवून घेऊ लागलो, असा आल्हाद अनुभव विरळाच. थोड्या वेळाने निघालो पुढे.गडाच्या सुळक्याला प्रदक्षिणा घालून खिंडीत पोहोचलो तेथेच एक पुरातन शिवमंदिराचे अवशेष लागतात. एक पिंडी आणी तीन मोठे सपाट ताशीव दगड आहेत तिथे. आजूबाजूचे दगड पुरातन मंदिराच्या अस्थित्वाची साक्ष देतात अजूनही. 

ज्याने हे मंदिर उभारलं असेल तो खरचं रसिक असावा, एका बाजूला गोरखगड, समोर मच्छिंद्रगड आणी दोन्ही बाजूंच्या दर्यांमध्ये घनदाट जंगल. पावसाळ्यात तर फारच विलोभनीय दृश्य. येथूनच एक पायवाट सिद्धगडाकडे आणी दुसरी मच्छिंद्रगडा कडे जाते. मंदिराच्या मागच्या बाजूने गोरखगडावर चढाईची सुरुवात होते. समोर एका जुनाट वृक्षाच्या मुळ्या एका पाषाण भिंतीमधून डोकावताना अप्रतीम दिसत होत्या. आजूबाजूची सर्व तटबंदी वेळ आणी काळा सोबत नष्ट झाली आहे पण झाडाच्या मुळ्यानी ही तटबंदी शाबुत ठेवली आहे. एक सुंदर फोटो घेवून पुढे निघालो.

डावीकडे एक उभ्या कातळात खोदलेली गुहा आहे आणी उजवीकडून वर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत. समोरच वरच्या बाजूला गडाचा दरवाजा दिसतो, इथे एक दोरी चढण्या साठी बांधलेली आहे, पण ह्या ठिकाणी तिची आवश्यकता मलातरी वाटली नाही. दरवाज्या मध्ये मस्त फोटोसेशन करून कातळात खोदलेल्या पायर्यांनी वर निघालो, 
तेथेच वर तीन पाण्याची टाक आहेत. समोरची वाट पुन्हा लहान चढणीने वर घेवून जाते. चाफ्याचं खूप मोठ्ठ झाड आहे. पायऱ्या उतरून गेल्यावर समोरच प्राचीन अतिभव्य गुहा लागते. ही गुहा गोरखगडाच्या सुळक्यामध्ये अगदी मधोमध कोरली आहे. आरामात १०० एक लोक राहू शकतात ह्या गुहेत. गुहेच्या आवारातून समोरच ढगांच्या आछादनातून वर आलेला माचीन्द्रगडाचा सुळका नजर खिळवून ठेवतो. 
निसर्गाचा एक अप्रतीम आविष्कार आहे गोरखगड आणी मच्छिंद्रगड, निसर्गाने भरभरून दिलय ह्या ठिकाणाला आणी अजूनही स्वार्थी मनुष्यप्राण्या पासून लांबच असलेला हा भाग आहे. तिथे पोहोचल्यावर कळत कि ऋषीमुनींनी अशाच जागा आपल्या ध्यानधारणे साठी का निवडल्या असाव्यात. माणसांच्या कोलाहला पासून दूर निसर्गाच्या साक्षीतच, आत्मरूप विसरून ईश्वराच्या सानिध्यात एकरूप होण्याची ईश्वर देणगी लाभलेल्या या जागा आहेत.गुहेच्या बाजूला पाण्याची तीन टाकी आहेत, पण गुहेच्या डाव्या बाजूला असलेल्या टाक्यातील पाणीच फक्त पिण्यायोग्य आहे. येथली कातळात कोरलेली जागा ही शेवाळामुळे फारच गुळगुळीत झालेली असते, जरा जपूनच चालावं लागता इथे. अजूनही गोरक्षगडाच्या माथ्यावर पोहोचायचं होता. गुहेच्या डाव्या बाजूने पाण्याच्या टाक्या पार करून पुढे निघालं कि एक लोखंडाची शिडी लागते, हो, येथून पुढचा प्रवास जरा जपूनच. ही शिडी फक्त उभी करून ठेवलेली आहे, कोठेही बांधलेली वा फिक्स केलेली नाही म्हणून फार जपून चढावं लागता इथून. वर सरळ पोटावर येणारा चढ आहे, कातळात खोदलेल्या पायऱ्या कालावंतीनदुर्ग आणी हरिहर किल्ल्याच्या पायर्यांची आठवण करून देतात. पण तरीही पावसाळ्यात ह्या पायऱ्या चढणे म्हणजे दिव्यच आहे. फारच अरुंद जागा आणी तुटलेल्या पायऱ्या मुळे पावसाळ्यात जरा जपूनच चढावं लागतं.

ह्या पायऱ्या चढून गेल्यावर, वर एक शीवमंदिर आणी त्या पुढे एक नंदी आहे. गडाचा माथा फारच लहान आहे कदाचीत ह्या गडाचा उपयोग फक्त आजूबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठीच होत असावा. कारण आहुपे घाट, जवळच माळशेज घाट आहे, बाजूला सिद्धगड, नाणेघाट, जीवधन आणी मच्छिन्द्रगडाची एक साखळी आहे. 
Post a Comment