September 20, 2015

फुफाटा


      कधीपासून बबन्या फुफाट्याकडं नीस्ता एकुलग्यावानी पघत बसला व्हता. दोन घटका व्हून गेल्या, पर ह्यो काय बुडाखालचा दगुड सोडाया तयार न्हायी. ऐन पानकाळ्यात फुफाट्यासगट वावटळी धुडगूस घालत्याल तर जीवाला घोर लागून ऱ्हायचाच.
      वरीसभरापासूनचा काळ नदरं म्होरून घसारला. तसा गाव कधीबी दुष्काळाचा बाधी न्हवता, तीन वरसापासून व्हत्याचं न्हवतं झालं. एक पीक हाताला घावलं नाय. मागल्या पानकाळ्यात तांबटाचा फड लय रगाट निघाला, अशी मोठाली तांबटं येका मुठीमंदीबी नाय घावायची. मोठ्या कवतीकानं जाळ्या भरूभरू तांबटं मार्केटात आनी गुजरीला पाठवून दिली. ऐनवक्ताला बाजार असा काय उठला की चार वरसात एव्हडा कमी भाव नाय पघितला. समदा बाजार लालभडक दिसाया लागला व्हता, सारा फड उखुड्य़ाचा धनी झाला. त्याच येळी दीड यकरात उसाचा फड धरला व्हता, उनकाळ्यातसुधा हिरीचं पानी पुरूनपुरून उस जगावला आनी उनकाळ्याच्या शेवटाला आभाळाचं प्वाट फाटलं, धडाधड पांढुरक्या गारा पडाय लागल्या. समदा उसाचा फड दिसात आडवा झाला, पर म्हणायला उंदरांची मातुर जत्रा साजरी झाली.
      तशाच तिरीमिरीत बबन्या उठला आनी गावातल्या सोसायटीच्या इमारतीकडं निघाला. पायात चामड्याच्या वहाणा, त्यांच्या तळाला नाळ ठोकल्यामुळं एकेकीच वजान आर्धाकिलो नक्की भरलं आसतं. पर त्याला त्याचं कायबी नव्हतं, गडी झपाझप पावलं टाकीत निघाला. गावच्या वाटा म्हंजी वढे व्हते, पूरवी या वढ्यानाल्यांमधून चारचार महीनं पानी सरायचं न्हाय, मंग वढ्याच्या वरल्या अंगाला वाट व्हती वावरामधनं ती वापरायची लोक, आता सामद्यांची बागायती झाल्या पासून ती वाटबी ऱ्हायली नाय आनी पाझरतलाव झाल्यापासून वढ्याला पानीबी कधी निघालं नाय. निस्ता फुफाटा आनी खकाना. आता बबन्याच्या वहाणा फुफाट्यातूनच वाट काढीत निघाल्या गावाकडं, तसा ग्रामपंचायतीनं टाकल्याली खडी आधूनमधून डोकंवर काढीत व्हती. तलाठ्या पासून सरपंचापातूर समद्यांची प्वाटं भरायची म्हंटल्यावर खडीचं तरी काय चुकलं म्हना ना.
      चिमट्यात पोचेपातूर घशाला खार लागली बबन्याच्या, सवयीनं पाय इठल्याच्या झापाकड वळलं आनी अचानक अंगातून ईज गेल्यावानी बबन्या खाली फुफाट्याकडं पघत एका जागी थांबला. कालच इठल्याची म्हातारी वढ्याच्या फुफाट्यात पाय घासून उलागली. दुपारच्या वक्ताला घरातली समदी वावरात खोडक्या येचायला गेली आनी म्हातारी एकटीच निघाली झाड्याला, अशी काय तव्हारली माध्यानीच्या गरमाटात. वरून सूर्यदेव आग वकीत व्हता आन खाली गरम फुफाटा जाळ काढीत व्हता. दुपारच्या वक्ताला चिटपाखरूबी वढ्याला नव्हतं, तशीच फुफाट्यात पाय घासूघासू म्हातारी उलागली. कोटकराचा शिवन्या उनखाली झाल्यावर गावात निघाला आन त्याला फुफाट्यात म्हातारी मरून पडल्याली दिसली.
      तसाच बबन्या माघारी वळला आनी रावसाहेबाच्या वट्यावर वाहणा काढून रांजनातल पानी घटाघटा प्याला. रांजनानी तर पार तळकाढला व्हता, पान्याची चवपन माताट लागत व्हती. हिरीनं तळ काढल्या पासून पान्याची हि अशीच बोंब हाय. गावाकडून येनारा वढा इथंच खालच्या आन वरच्या आंगाला दुभांगत व्हता. बरुबर दुभांग्यात रावसाहेबाचा झाप आणि हिर, आनी म्हनुनच याला चिमटा म्हणत असत्याल पूर्वापार. बबन्या कसल्याशा व्हढीनं वहाणा पायात अडकवून निघाला गावाकडं, त्याचं मन सारखं सोसायटीच्या इमारतीकडं धावत व्हतं. परत येकदा बबन्यानी वहाणा गरम फुफाट्यात घातल्या, आन फुफाट्याचा जाळ पायाला जानावला.
येव्हड्या घाईघाई गावात निघाल्याचंबी कारन व्हत बबन्याचं. सरकारानं दुष्काळग्रस्ताना आनी नुसकानग्रस्त शेतकऱ्यास्नि मदत म्हनून पैका मंजूर केल्याला. मागल्या आठीवड्या पासून बबन्याचं पाच सहा हेलपाटे झालं सोसायटीपातूर. दोन महिन्या आदूगर वावार नांगरून, गबाळगुबाळ काढून येकदम झाक करून पेरनी साठी पावसाची वाट पघत बसला व्हता. दोन दिस पावसानी भुरभूर केली, पार आभाळ काळवंडून आलं, वाटलं पावसानं सुरवात केली. समद्या गावानं पेरनी उराकली. तरी पांडूपाटलाचा म्हाद्या सांगत व्हता, बबन्या एव्हढी घाईकरू नगं पावसाचा रागरंग न्हायी दिसत चांगला. पर आमी शेतकरी पेरनी न्हायी करनार तर खानार काय ?.
      त्या दिसापासून पावसानं अशी काय व्हढ लावली की टिप्पूसभी पावसाचा नदरं न्हायी पडला. सारं ब्येनं मातीत गेलं, पाखरांनी मातुर मज्जा केली पेरनीवर. आज नुसकानग्रस्त शेतकरी कोन हाये आनी किती मदत मिळनार त्ये समजनार व्हतं. त्याच व्हढीनं बबन्या फुफाट्यातून गावाकडं तिरीमिरीत निघाल्याला.
      दुपारच्या उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला व्हता, गावात पिंपळाचा पार फकस्त सावलीत आणि बाकी गावात उन्हाचा रखरखाट पसारल्याला, नाय म्हनता चार कुत्री मातुर पारावर निपचीत पडली व्हती. एकानी जरा कान वर करून चाहूल घेतली, एव्हड्य़ा दुपारच्या वक्ताला बबन्या आगान्तुकच त्यांच्यासाठी, परत आपलं पायामधी डोकं खुपसून गपगार पडलं ब्येनं. पलीकडच्या विष्ण्याच्या दुकानाजवळ चार टकूरी पत्यांचा डाव मांडून बसल्याली, बबन्यानं लांबूनच नमस्कार चमत्कार करून सोसायटीकडं पाय वाळीवलं. तिथंच भास्कर पायाच्या नखातली घान काढत बसल्याला, बबन्यानी त्याला मदतीचा इचारल्याबरुबर गडी डाफारला, आन डाव्या हातानीच बोर्डाकडं ब्वाट दाखीवलं. बबन्या इजेगत बोर्डाकडं न्हीगाला. बापाच्या पुन्यायीनं मरायच्या आदुगर बबन्याला चवथीपातूर पाटी-पेन्सीळ धराया लावल्याली. बबन्या रांगेत “बबन भाऊ कोटकर” शोधीत व्हता, येकदम नावाम्होरं येवून थांबला. आनी पायातला बळच गेल्यावानी मटकन खाली बसला. बाहीर वावटळीनं चौखूर फेर धरल्याला, उन्च आभाळाला फुफाट्याचा डोंगुर चढला व्हता. तशीच वावटळ सोसायटीच्या पत्र्यांचा खडखडाट करून पुढं निघाली. सगळ्या सोसायटीच्या पढवीत लालभडक फुफाट्याचा थर झाला, सगळ्या फुफाट्याचा खाकाना बबन्याच्या अंगावर झाला त्या परीस जास्तच फुफाटा बबन्याच्या आशेचा झाला व्हता आठशे रुपये पघून.

No comments: