October 20, 2015

रतनगड - एक स्ट्रेस बस्टर ( Ratangad )

रतनगड - एक स्ट्रेस बस्टर 

प्रवरा नदीचे उगमस्थान असलेला हा गड, येथले घनदाट जंगल अजूनही वन्य प्राणी / पक्षांनी समृद्ध आहे. भंडारदरा धरणाच्या साठ्या मुळे सुपीक असलेला हा प्रदेश. धरणाच्या चोहो बाजूने एक समृद्ध जंगल तयार झाले आहे. या जंगलात बिबळे, भेकरे, सायाळी, तरस, लांडगे, मोर, रानडुकरे, कोल्हे, रानमांजरी, वानर, माकडे, ससे आहेत.



रतनगड हा अतिशय दुर्गम आणि देखणा असा गड आहे. रतनगडाच्या पायथ्याशी अमृतेश्वर महादेवाचे एक हेमाडपंती, १२०० वर्षां पूर्वीचे मंदिर, यादवकालीन स्थापत्यशास्त्राची आठवण करून देते. एकअप्रतीम स्थापत्यशास्त्राचा नमुना. ह्या मंदिराच्या प्रवेशद्वारा वर समुद्र मंथनाचे शिल्प कोरलेले आहे त्याचा एक वेगळाच अर्थ मला कळाला, तूर्त तो बाजूलाच ठेवु (नंतर त्यावर सविस्तर बोलूच). 

अमृतेश्वर महादेवाचे एक हेमाडपंती१२०० वर्षां पूर्वीचे मंदिर

इतिहास
      तर रतनगड हा फार प्राचीन गड आहे जो आजूबाजूच्या विस्तीर्ण पठारावर, कोकणावर नजर ठेवण्यासाठी त्याच्या भौगोलीक स्थानामुळे महत्वाचा होता. या गडाची निर्मिती ही बहुतेक इसवीसनाच्या दहाव्या शतकात झंज राजाने केली. गडाबरोबरच पायथ्याच्या अमृतेश्वर मंदिराचीही निर्मिती झाली. या मंदिराच्या निर्मितीसाठी जेथून खडक फोडून काढला तेथेच विष्णुतीर्थ नामक पुष्करणीची निर्मिती झाली.

पेशवेकाळात रतनगडाचा उल्लेख आला आहे. पेशव्यांनीच नैवेध आणि नंदादीपाची व्यवस्था केल्याची सनद आहे.
“श्री महादेव रतनगड किल्ल्या खाली आहे. त्यास बाळाजी काराळे यांनी किल्ले रतनगड समयी नवस केला. त्या प्रमाणे रतनगड देविले. सदरहू सामान श्री च्या गुरुवाजवळ देऊन नित्य नैवेद्य व नंदादीप ताकीद करून चालविणे म्हणून मोरे महादेव यास सनद रतनगडाच्या भौगोलिक स्थनामुळे राजुर व अलंग घाटमाथ्यावरचे अन सोकुलवाडी व जरूस्त्रोशी हे कोकणातले महाल या गडाच्या अधिपत्याखाली होते.”

इंग्रजांनी गड घेण्या आधी जावजी कोळी सरदाराच्या अधिपत्याखाली गड होता. कॅप्टन गोडार्ड ने १८२० मध्ये गडावर ताबा मिळवला. पण लगेच पूर्वीच्या किल्लेदार गोविंदराव याने रामजी भांग्रीवाला याला हाताशी धरून परत किल्ला जिंकला.

      गडावर जाण्यासाठि तीन वाटा आहेत. एक ठाणे जिल्ह्यातून, शहापूर तालुक्यात आजोबागडाच्या पायथ्याशी डेणे गावातून कोरोली घाट मार्गाने, ही वाट फार लांबची आहे. दुसर्‍या दोन वाटा नगर जिल्ह्यातून (रतनवाडी हून) गणेश दरवाजाने किंवा त्र्यंबकदरवाजाने जाते. गडाला एकूण तीन दरवाजे आहेत, गणेशदरवाजा, त्र्यंबकदरवाजा आणी कोकणदरवाजा.
      पावसाळ्यामधे रतनगड आणि परिसर हा जणूकाही स्वर्गात आल्याचीच अनुभूति देवून जातो. रतनवाडीहून गडाकडे जाणारी पाऊलवाट ही प्रवरेच्या काठानेच सुरू होते, येथे प्रवारेचं पात्र म्हणजे एखाद्या ओढ्याहून मोठे नाही. गडाची पाऊलवाट सुरू होयीपर्यन्त नदीचे पात्र निदान ३ वेळा तरी ओलांडावे लागते, पाण्याची खोलीही ३ फुटा पेक्षा जास्त नसते. भातशेती सोडल्यानंतर गडाची पाऊलवाट चढणीला लागते. संपूर्ण वाट ही घनदाट जंगलामधूनच जाते. 


पहिला चढ संपल्यानंतर एक छोटं पठार लागतं, पठारावर समोर ढगात लपलेला गड आणी खाली दरीमधे फेसाळत्या प्रवाहाने धबधब्याच्या रूपात पडणारी प्रवारा नदी दर्शन देते. तसेच मागे बघितले की भंडारदरा धरणाचा अथांग जलाशय दिसतो. परत एक नागमोडी वाट जंगलात शिरते. पुन्हा घनदाट जुंगलातून पायपिट सुरू. जवळपास तासाभरची पायपिट केल्यावर दोन वाटा लागतात, सरळ वाट ही कात्राबाईच्या खिंडीतून हरिश्चंद्राकडे जाते (अजून हरिश्चंद्र या वाटेने करायचा राहिलाय ), आणी उजवी वाट रतनगडावर जाते. रतनगड एव्हडयावेळा केलाय की आता या पाउलवाटा ओळखीच्या झाल्यात. 


पुन्हा थोडा जंगल तुडवलं की आपण गणेश दरवाज्याखाली असलेल्या लोखंडी शिड्यांजवळ येवून पोहोचतो. येथेही इंग्रजांनी गडाची नासधूस केल्यामुळे लोखंडी शिड्या लावण्याची पाळी आली आहे. शिड्या चढल्यानंतर पूर्वाभिमुख गणेश दरवाजा लागतो. पुढे उजव्याबाजूला थोड्या कातळ पायर्‍या चढून गेल्यावर उजव्या हाताची वाट गुहांकडे घेवून जाते आणी डाव्या हाताची वाट ही हनुमान दरवाजातून गडावर घेवून जाते. 
 गणेश दरवाजा


गुहांकडे मोर्चा वळवल्यावर सुरूवातीला एक लहान गुहा लागते, या गुहेत गडाची अधिष्ठाती रत्नादेवी शेंदरी तांडळ्याच्या रूपात, गणेशमूर्ती शेजारी वसली आहे. तसेच पुढे गेल्यावर एक प्रशस्त गुहा लागते या गुहेच्या पोटात आणखी दोन लहान गुहा आहेत. एका गुहेत एका गाववाल्याने गिर्यारोहकांना चहा / जेवण्याच्या सोयी साठी बस्तान बसवले आहे. तरीही एका वेळी १००-१५० माणसं एका वेळी राहू शकतात. गुहेच्या बाहेरच पाण्याचं टाकं आहे.
गडाची अधिष्ठाती रत्नादेवी



प्रशस्त गुहा


      पुन्हा मागेयेऊन गडावर निघाल्यावर, हनुमान दरवाज्यावर मत्स्यावतार, हनुमान, सूर्य, वेताळ, मगर, गणपती रीध्ही-सीध्हीची शिल्पे कोरलेली दिसतात. हनुमान दरवाजातून गडावर जाताच समोर कात्राबाईची डोंगररांग दिसते, पलीकडे नफ्त्याचा डोंगर आणी त्या पलीकडे हरिश्चंद्रगड दिसतो. गडाच्या पूर्वेकडे जेथून कात्राबाईची डोंगररांग दिसते तेथेच कातळात अर्धंगोलाकार पाण्याचे टाके खोदलेले आहे. 
कात्राबाईची डोंगररांग
कातळात अर्धंगोलाकार पाण्याचे टाके

राणीचा हूडा

आता गडावर निघाल्यावर समोरच एक दगडी बांधणीचा वर्तुळाकार बुरूज आहे. यालाच राणीचा हूडा म्हणतात (याची पडझड खूप जलद होते आहे, कृपया फोटो काढण्यासाठी भिंतींवर चढू नका नाहीतर भविष्यात फक्त फोटोतच पहावा लागेल हा). बुरूजाच्या मागेच पाण्याची तीन लहान-मोठी टाकी आहेत. बुरूजाच्या पूर्वेला (उजव्या हाताने) पुढे गेल्यावर जरावर पाण्याचे जे स्वछ: टाके आहे तेथेच अमृतवाहीनी प्रवरेचा उगम होतो, बाजूलाच एक छोटी महादेवाची पिंड आणी नंदीची मूर्ती कोरलेली आहे. हूड्याच्या मागे डाव्या हाताला (दक्षिणेला) जाणारी वाट ही गडाला प्रदक्षिणा घालून जाते. पश्चिमेला छोटं पठार आहे. थोड्या अंतरावर एक नागमोडी भिंत लागते आणी तेथेच खाली अर्ध्या गाडलेल्या अवस्थेतील गडाचे पश्चिम द्वार दिसते (कोकण/कल्याण दरवाजा). तेथून उतरायची वाट मोठी कठीण आहे. आताच काही स्थानिक वाटाड्यांनी दरवाजा खालील काही पायर्‍या शोधून काढल्या आहेत (पण त्या साठी दोर लाउन थोडं खाली उतरावं लागतं. दरवाज्याच्या पुढे गेल्यावर दोन आयताकृती ८ – १० मी. लांबीची टाकी आहेत आणी त्यांना छेदून जाणारे आणखी एक टाके आहे. तसेच पुढे गेल्यावर सहा टाक्यांचा एक समूह आहे. पुढे एक भुयारी टाके आहे. तेथून सरळ पुढे पायवाट नेढया कडे घेवून जाते (नेढे म्हणजे डोंगराला नैसर्गिक पडलेले आरपार होल). या नेढया मधून कळसूबाई, अलंग, मदन, हरिश्चंद्रगड भंडारदर्‍याचा अथांग जलाशय आणी पट्टा किल्या पर्यंतचा प्रदेश दिसतो. या नेढयातून पलीकडे उत्तरेला उतरता येते, ही वाट आपल्याला त्र्यंबक दरवाज्या पर्यन्त घेवून जाते. रतनगडाचा अत्यंत देखणा शिल्प जे राहिला आहे ते म्हणजे त्र्यंबक दरवाजा हा दरवाजा उत्तराभिमुख आहे. त्याचीही पडझड झाली आहे परंतु इतर स्थापत्यापेक्षा हा अजून चांगल्या अवस्थेत आहे. या दरवाज्यातून खाली उतरण्यासाठी १५० पायर्‍या आहेत, हा मार्ग रतनगडाच्या खुट्ट्या जवळून जातो. खुट्ट्या जवळून उजवीकडे जाणारी वाट ही आपल्याला पुन्हा रतनवाडीला आणि डावीकडे जाणारी वाट ही साम्रदला घेवून जाते.

रतनगडाचा खुट्टा


त्र्यंबक दरवाजा



त्र्यंबक दरवाजा







रतनगडाचा खुट्टा


अमृतेश्वर महादेवाचे मंदिर

अमृतेश्वर महादेवाचे मंदिर

पुष्करणी-विष्णुतीर्थ


Post a Comment