किल्ले धोड़प- हा महाराष्ट्रातील दूसरा सागळ्यात उंच किल्ला. उंच क़िल्ल्याचा मान हा साल्हेर क़िल्ल्याचा आहे. योगायोगाने दोन्ही किल्ले हे नाशीक जील्हयातच आहेत. नाशीक मधल्या कळवण तालूक्यात धोड़प किल्ला येतो. धोड़पची उंची समुद्र सपाटी पासुन ४८२९ फूट आहे. नाशीक मध्ये त्र्यंबकेश्वर, सातमाळ आणी बागलाण या सह्याद्रीच्या मुख्य डोंगररांगा व अजंठा-सातमाळ, बालाघाट या उपडोंगररांगा आहेत. त्यापैकि अजंठा-सातमाळ डोंगररांगेत हा किल्ला वसला आहे. या रांगांमध्ये वणी, सप्तश्रुंगी, मार्कंडा, रवळया-जवळया, कंचना आणी धोडप किल्ले येतात.
धोडप हा लाव्हारस उद्रेकाचा अनोखा नमूना आहे. धोडपची अरुंद माची ही "volcanic dike" प्रकाराने बनलेली आहे. Daik म्हणजे लाव्हारस वाहण्याचा मार्ग. उभ्या सरळसोट मार्गाने लाव्हा वाहतो आणी तसाच घट्ट झाल्यावर धोडपच्या माची सारखा भू- भाग तयार होतो. तसेच धोडपचा बालेकिल्ला हा "volcanic Plug" प्रकाराने बनलेला आहे. या प्रकारात लाव्हारस ज्वालामुखीच्या मुखातच घट्ट होतो आणी बालेकिल्ल्या सारखा भू-भाग तयार होतो.
तसं बघितल तर आम्ही नाशीक मधल्या किल्ल्यांचा श्री-गणेशा धोडपनेच केला. या आधी त्र्यंबकेश्वर आणी हरीहर किल्ले खूप वेळा केले आहेत. पण सातमाळ डोंगर रांगांची सुरुवात धोडप पासून केली. या किल्ल्याचा इतिहास फार रोचक नाही परंतु याचा प्राचीन उल्लेख हा १६ व्या शतकात किल्ले धरब म्हणून येतो. आधी निजामाकडून मोगलांच्या आलीवर्दी खानाने स. १६३५ मध्ये जिंकला. त्या नंतर मराठ्यांनी प्रयत्न करूनही त्यांना या किल्ल्यावर भगवा फडकवता आला नाही. नानासाहेब पेशव्यांच्या सत्ता काळात तहात हा किल्ला मराठ्यांच्या हाती लागला. मध्यावराव पेशवे आणी राघोबादादांच्या बेबनावात आणी त्यांच्या युद्धात राघोबादादांनी नाशिकला आपले बस्तान हलवले. त्यांना जनाजी भोसल्यांनी, दामाजी गायकवाडानी साथ दिली. [Grant Duff's Marathas, 340. Dhodap lies about twenty miles north-west of Chandor.]. राघोबा दादांनी किल्ले धोडपचा आश्रय घेतला. माधवरावांनी राघोबादादांचा पराभव किल्ले धोडप वर केला आणी त्यांना बंदी बनवून पुण्याला घेवून गेले.
तसं बाघितलं तर उन्हाल्यात हा ट्रेक केला की सर्वकाही व्यवस्थित पहाता येतं. पण उन्हाळ्यातील रखरखीत पणा टाळण्यासाठी आम्ही धोडपाची वारी पावसाळ्यातच करण्याचे योजले होते. नियोजन करताना फक्त दोघेच असणारे आम्ही निघताना पाचजणं झालो. अभिजीत, सचिन आणी नारायण दादांना आम्ही कल्याण स्टेशन वरुन घेतलं गाडीचा फुएल टॅंक भरून रात्री जवळपास १२ वाजता कल्याण वरुन चांदवड च्या दिशेने कूच केली. धोडप वर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, त्यातील एक कळवण वरुन ओतूर गावातून जातो तर दूसरा वडाळीभोई फटयावरून हट्टी गावातून जातो. हट्टी गावातून जाणारा मार्ग तुलनेने कमी वेळ घेणारा आहे. सकाळी जवळपास ५ वाजता आम्ही हट्टी गावात पोहोचलो.
गावातच मारूतीचं प्राचीन मंदिर आहे. तेथेच गाडी लावून थोडावेळ झोप काढली तोपर्यंत नारायण दादांनी पोह्याची आणी चहाची सोय केली. चहासाठी कप मिळाले नाहीत म्हणून पोहयांच्या प्लेट मधेच चहा भुरके मारून प्यायलो. चहा देणार्या गावकर्याला यथेछ लाखोल्या वहात किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो.
किल्ल्याच्या पायथ्यापासूनच पायवाट सुरू होते, पायवाट सुरू होते तिथेच अक मारुतीची पुरातन मूर्ती आहे. ही खडी पायवाट सरळ आपल्याला माचीवर घेवून जाते दोन ढासळलेल्या बुरूजांमधून आपण माचीवर येतो. येथेच कातळात असलेली छोटी टाकीवजा विहीर लागते या टाकीच्या कोनाड्यात गणपतीची शेंदूर लावलेली छोटी मूर्ती आहे. या पठारावर पुष्कळ जोती, मंदिरे आढळतात. या पठारावर छोटी वाडी आहे, सोनारवडी. मोजून हाताच्या बोटावर मोजता येतील एव्हडेच उंबरे आहेत येथे. थोडं पुढे चालत गेलं की उजव्या बाजूची पायवाट सोनारवाडीकडे व तेथून पुढे ओतूर कडे घेवून जाते, तर डावी वाट काही जुन्या मंदिरांकडे घेवून जाते. आम्ही सरळ गडाकडे जाणारी पायवाट धरली, या पायवाटेच्या सुरवातीलाच जुन्या भाजक्या विटांमध्ये बांधलेली विहीर किंवा बारव आहे, ही बारव म्हणजे जुन्या बांधकाम शैली चा उत्कृष्ट नमूना आहे. एकदा पहायलाच हवा.
आम्ही ती विहीर पाहून थेट गडावर निघालो. पण आधी संपूर्ण माची पहावी, या माचीवर जुन्या जोति, मंदिरं आणी खूप सारे पुरातन अवशेष विखुरलेले आहेत. गणपती मंदिराच्या मागील बाजूस असलेलं पाण्याचं टाकं वैशिष्ट्यपूर्ण आहे, याची रचना दोन टप्प्यात केली आहे, जेणेकरून वरच्या टाक्यात गाळ जमाहोवून, खालच्या टाक्यात नितळ पाणी मिळते. हीच वाट पुढे रवळया-जवळया या जोड दुर्गावर घेवून जाते.
आम्ही मात्र सरळ किल्ल्याकडे कूच केली. साधारण २० मिनिटांच्या चढाईनंतर उभा कातळ लागतो. कातळात खोदलेल्या पायर्यांजवळ आता लोखंडी शिड्या उभ्या केल्या आहेत. पुढे १० मिनिटांत आपण दगडी पायर्या चढून गेल्यावर आपण बालेकिल्ल्याच्या मुख्य दरवाजा जवळ येतो, येथेच फारसी भाषेतील दोन शिलालेख आहेत त्यातील एकाची फारच दुरवस्था झाली आहे. दरवाजा म्हणजे फक्त कमान उरली आहे लकडी दरवाजा अस्तीत्वात नाही. आता L आकाराच्या बोगदेवजा मार्गाने आपण किल्ल्यात प्रवेश करतो.
दरवाजा ओलांडून गेल्यावर १५-२० मिनिटात आपण गडमाथ्यावर पोहोचतो. प्रवेश करताच दोन्ही बाजूला पाण्याची टाकी आणी त्यापुढे पडक्या वाड्यांचे अवशेष लागतात. वाड्यापासून उजव्या अंगाची वाटही गडाच्या सुळक्याकडे म्हणजेच शेंडीकडे घेवून जाते. पुढे आपण शेंडीच्या पोटाशी, दोन खांबी गुहेपाशी पोहोचतो. तेथून सरळ पायवाट आपल्याला शेवटच्या राहण्यायोग्य गुहेपाशी आणी देवीचे मंदिर असलेल्या गुहेजवळ घेवून जाते.
वाटेत शेंडीच्या पोटाशी खूप वैशिष्ट्यपूर्ण पाण्याची टाकी आणी गूहा आहेत. शेवटच्या गूहेत पिण्यायोग्य पाणी आणी त्याच्या बाजूला शंकराची पिंड आहे. पुढे गेल्यावर धोडपच्या नैसर्गिक कातळ खाचेपर्यंत आपण पोहोचतो.पुढे शेंडीला वळसा घालून आपण पुन्हा दोन खांबी गुहेपाशी पोहोचतो.
माछिंद्र दादा, अभिजीत आणी नारायण दादांची शेंडी सर करण्याची इछा आम्ही जोरदार पाऊस आणी वार्यामुळे पुढे ढकलली. पण नक्कीच पुढील धोडपवारीला आम्ही धोडपची शेंडी सर करू.
धोडप भेटीत अभिजीतची फोटो काढून घेण्याची हौस मात्र पूर्ण झाली, नाहीतर एव्हडी आरामात कोणतीच दुर्ग भेट होत नाही आमची.
No comments:
Post a Comment