September 20, 2015

फुफाटा


      कधीपासून बबन्या फुफाट्याकडं नीस्ता एकुलग्यावानी पघत बसला व्हता. दोन घटका व्हून गेल्या, पर ह्यो काय बुडाखालचा दगुड सोडाया तयार न्हायी. ऐन पानकाळ्यात फुफाट्यासगट वावटळी धुडगूस घालत्याल तर जीवाला घोर लागून ऱ्हायचाच.
      वरीसभरापासूनचा काळ नदरं म्होरून घसारला. तसा गाव कधीबी दुष्काळाचा बाधी न्हवता, तीन वरसापासून व्हत्याचं न्हवतं झालं. एक पीक हाताला घावलं नाय. मागल्या पानकाळ्यात तांबटाचा फड लय रगाट निघाला, अशी मोठाली तांबटं येका मुठीमंदीबी नाय घावायची. मोठ्या कवतीकानं जाळ्या भरूभरू तांबटं मार्केटात आनी गुजरीला पाठवून दिली. ऐनवक्ताला बाजार असा काय उठला की चार वरसात एव्हडा कमी भाव नाय पघितला. समदा बाजार लालभडक दिसाया लागला व्हता, सारा फड उखुड्य़ाचा धनी झाला. त्याच येळी दीड यकरात उसाचा फड धरला व्हता, उनकाळ्यातसुधा हिरीचं पानी पुरूनपुरून उस जगावला आनी उनकाळ्याच्या शेवटाला आभाळाचं प्वाट फाटलं, धडाधड पांढुरक्या गारा पडाय लागल्या. समदा उसाचा फड दिसात आडवा झाला, पर म्हणायला उंदरांची मातुर जत्रा साजरी झाली.