September 20, 2015

फुफाटा


      कधीपासून बबन्या फुफाट्याकडं नीस्ता एकुलग्यावानी पघत बसला व्हता. दोन घटका व्हून गेल्या, पर ह्यो काय बुडाखालचा दगुड सोडाया तयार न्हायी. ऐन पानकाळ्यात फुफाट्यासगट वावटळी धुडगूस घालत्याल तर जीवाला घोर लागून ऱ्हायचाच.
      वरीसभरापासूनचा काळ नदरं म्होरून घसारला. तसा गाव कधीबी दुष्काळाचा बाधी न्हवता, तीन वरसापासून व्हत्याचं न्हवतं झालं. एक पीक हाताला घावलं नाय. मागल्या पानकाळ्यात तांबटाचा फड लय रगाट निघाला, अशी मोठाली तांबटं येका मुठीमंदीबी नाय घावायची. मोठ्या कवतीकानं जाळ्या भरूभरू तांबटं मार्केटात आनी गुजरीला पाठवून दिली. ऐनवक्ताला बाजार असा काय उठला की चार वरसात एव्हडा कमी भाव नाय पघितला. समदा बाजार लालभडक दिसाया लागला व्हता, सारा फड उखुड्य़ाचा धनी झाला. त्याच येळी दीड यकरात उसाचा फड धरला व्हता, उनकाळ्यातसुधा हिरीचं पानी पुरूनपुरून उस जगावला आनी उनकाळ्याच्या शेवटाला आभाळाचं प्वाट फाटलं, धडाधड पांढुरक्या गारा पडाय लागल्या. समदा उसाचा फड दिसात आडवा झाला, पर म्हणायला उंदरांची मातुर जत्रा साजरी झाली.

August 10, 2015

Gorakhgad Trek - गोरखगड

गोरखगड- 

 तारीख : ८ ऑगस्ट २०१५


किल्ले गोरखगड, काढली बाईक आणी निघालोना बुंगाट. तसा जवळच पण आडवळणावरचा किल्ला. म्हणूनच राहिला होता खूप दिवसांपासून. हो-नाही करता करता दोघेच राहिलो नेहमीचे पंटर. कर्जत वरून “म्हसा” या गावी पोहोचून दहेरी गावात पोहोचावे लागते. गावातून थोडा मागे येवून मंदिरामागून एक पाउलवाट जंगलात शिरते. तसा लोकांच्या जास्त माहितीतला नाहीये हा गड, म्हणूनच इतर गड/किल्ल्या पेक्षा वर्दळ कमी आहे गोरखगडावर.
हा भाग तसा भीमाशंकरच्या अभायाराण्याचाच भाग आहे. मच्छिंद्रगड, गोरखगड हे शेजारी शेजारी आहेत. गोरखगड म्हणजे नाथसंप्रदायातल्या गोरक्षनाथांच्या साधनेची जागा. सिद्धगड, गोरक्षगड आणी मच्छिंद्रगड असा आवडता ट्रेक करणारे खूप ट्रेकर्स आहेत. आधी सिद्धगड करून जंगलातून धबधब्यांचा आनंद घेत गोरखगडावर पोहोचायचं, तेथेच मुक्काम करून मग गोरखगडावर मार्गक्रमण करून माचीन्द्रगडावर निघायचं, असा हौशी गिर्यारोहकांचा मार्ग असतो. गोरक्षगड आणी मच्छिंद्रगडाच्या सुळक्यांमुळे तसा हा हाडाच्या गिर्यारोहकांसाठी हवाहवासा ट्रेक आहे.

June 22, 2015

Harishchandragad Trek - साक्षात्कारी हरिश्चंद्रगड

हरीश्चंद्राच्या वाऱ्या तशा आधीही झाल्यात, कधी खिरेश्वर तर कधी पाचनयी वरून. प्रत्येक वेळी त्याच सौंदर्य मनाला भारून टाकणारं. पावसानं चिंब भिजलेल्या काळ्या पाषाणाचं मंदिर,  ओलेत्या अंगानं आणि शेवाळाच्या संगतीने निळ्याशार आकाशाच्या background वर खरंच खूप सुंदर दिसतं. हिवाळ्यात थंडीच्या कडाक्यात, धुक्यात हरवलेलं मंदिर शोधताना खरी गंमत  अनुभवायला मिळते.
 पण एव्हडं असूनही कोकणकडा आणि तिथून दिसणारा नजारा नजरेत साठवता आला नव्हता कधी. कधी कोकणकडा ओलेत्या अंगाने व ढगांची चादर पांघरून बसलेला, तर कधी कडाक्याच्या थंडीत धुक्याची दुलई घेवून निजलेला पाहिलाय मी. पावसाळ्यात  सरींना सोबत घेवून येणारा आद्र वारा आणि थंडीत गारठवणाऱ्या धुक्यातला लपंडाव, हे सारं एकदा तरी अनुभवणं म्हणजेच  माझ्या लेखी स्वर्ग.